नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. पवार-खडसे भेटीनंतर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावर उघड नाराजी (Eknath Khadse Sharad Pawar Secrete Meet) व्यक्त केली होती.
शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती ‘टीव्ही9 मराठी’च्या सूत्रांनी दिली आहे. पवार-खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले.
विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात गोपीनाथगडावरुन दिले होते.
एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी
एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज आहेत. मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा जाहीर आरोप खडसेंनी केला होता. या पार्श्वभूमीवर आधी खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होतीच, शिवाय दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती.
एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र भाजप नेते भेटलेच नव्हते. तिथे त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
गोपीनाथ गडावर खडसेंचा हल्लाबोल
एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी (12 डिसेंबर) बीडमधील गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला होता. “देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला होता.
शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मागील काही काळापासून चांगलाच वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे ते काय भूमिका घेणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारी पवार-खडसे भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीदरम्यान काय मोठा निर्णय होणार की ही भेटही केवळ चर्चेचाच विषय ठरणार हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट (Eknath Khadse Sharad Pawar Secrete Meet) होणार आहे.