जळगाव : जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आलाय. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कछित वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं (Pune Police) पथक तपासासाठी जळगावमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले आमदार गिरीश महाजन (Girish Majahan) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेच पुणे पोलीस जळगावमध्ये दाखल झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. महाजनांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर खडसे यांनी राजकीय टायमिंग साधत जोरदार चिमटा काढला होता. महाजन यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही समोर आलं. त्या भीतीपोटीच गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली, असा टोला खडसे यांनी लगावला. तसंच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले राहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी पार्थना करणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
खडसे यांनी महाजनांना टोला लगावल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाच्या तपासासाठी पुणे पोलीस जळगावात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे महाजनांची कोंडी करण्यात यशस्वी झाल्याची चर्चाही जळगावात सुरु आहे.
जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादात भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार जळगावातील अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी दीड वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पुढे तो गुन्हा पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलाय. याच गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलीस जळगावात ठाण मांडून आहेत. या गुन्ह्यात गिरीश महाजन यांच्यासह इतर 29 आरोपींवर मोक्काची कारवाई व्हावी, अशी विजय पाटील यांची मागणी आहे.
दरम्यान, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात आपल्यावर मोक्काची कारवाई होणार आहे की नाही, याची आपल्याला कल्पना नाही. हा गुन्हा खोटा आहे. तरीही आपण न्यायालयीन लढाई लढू, असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.
इतर बातम्या :