जळगाव : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) नेतृत्वावर भाष्य केले.
धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही असे खडसे म्हणाले. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील.
पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा असे म्हणत एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केले.
बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेना पक्ष वाढीसाठी घालवलं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती.
बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे. शिवसेना पक्षात दुभंगला आहे, पूर्णतः मोडला गेला आहे. ही बाब फक्त राज्याच्याच नाही तर शिवसेनेच्या दृष्टीनेही हिताची नाही अशी चिंता देखील खडसे यांनी व्यक्त केली आहे.