मुंबई : आधी सुरत…मग गुवाहाटी…मग गोवा आणि आज रिटर्न मुंबई मुक्कामी… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार आजच मुंबईत दाखल झाले आहेत. या आमदारांचा गोवा ते मुंबई प्रवास बघून कोणीही एवढच म्हणेल की…काय ते विमान…काय ती नाद खुळा एन्ट्री…काय तो गाड्यांचा ताफा…काय तो पोलिसांचा बंदोबस्त…काय तो आमदारांचा थाट…काय ते ढोल ताशाच्या गजरात स्वागत…काय ती मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज…काय तो नाक्या नाक्यावर कॅमेरा…काय ते ताज हाटेल…आमदार ओक्केमध्ये मुंबई मुक्कामी…हे झालं शाहजीबापू पाटलांच्या शब्दातलं आमदारांच्या (Shivsena Mla) मुंबईतील एन्ट्रीचं वर्णन. मात्र हे असं या प्रवासाचं (Goa To Mumbai) वर्णन करण्याला कारणही तशीच आहेत. या आमदारांचा हा प्रवास होताच तेवढा रंजक. हे सर्व पाहून कुणालाही मी आमदार व्हावं असं वाटल्याशिवाय राहिलं नसेल. रात्री हे आमदार मुंबई विमानतळावर (Eknath Shinde Group MLA) पोहोचले.
हे आमदार विमानतळावर पोहचण्याआधीच विमानतळावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय या आमदारांसाठी वेगळा कॉरिडोर तयार करण्यात आला होता. अगदी आनंदात हे आमदार विमानाच्या बाहेर पडले. त्यावेळी आमदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. भाजप नेत्यांची फळीही या आमदारांच्या स्वागतासाठी आधीच विमानतळावर पोहोचली होती. सर्वांचं स्वागत गळाभेटीनं झालं. त्यानंतर हे आमदार विमानतळाच्या बाहेर पडले.
आमदार विमानतळाच्या बाहेर पडताना पोलिसांच्या गाड्यांचा मोठा ताफा हा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. रस्त्यावर सगळीकडे जणू सायरनचा आवाजच घूमत होता. मात्र काही वेळातच या जबरदस्त एन्ट्रीला ब्रेक लागला आणि सर्वांच्या मनातला सस्पेन्स वाढला. मुख्यमंत्रीही गाडीतून उतरून खाली आहे. मात्र, या आमदारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हे ढोलताशे घेऊन दाखल झाले होते. त्यांना अभिवान करण्यासाठी मुख्यमंत्री उतरल्याचे लक्षात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेजही बघण्यासारखीच होती. त्यानंतर मुख्यमंत्री हे पुन्हा गाडीत बसले आणि ताज हॉटेलकडे रवाना झाले.
यावेळी विमानतळ ते ताज हॉटेल या मार्गावर जागोजागी तगडा पोलीस बंदबस्त लावण्यात आला होता. एकही गाडी या आमदारांच्या मार्गात येऊ नये यासाठी सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली होती. या आमदारांच्या तीन बसेसच्या आसपास तब्बल तीस ते पस्तीस गाड्यांचा ताफा सुरक्षा हाताळत होता. अशी तगडी एन्ट्री कदाचितच कुणााची झाली असेल. या जबरदस्त बंदोबस्तात आमदार अखेर ताज हॉटेलवर पोहोचले. तिथं फडणवीस आधीच पोहोचले होते. मग तिथून पुढे पुढचा कार्यक्रम सुरू झाला. अशा जबरदस्त एन्ट्रीत आमदार अखेर 11 दिवसांनंतर मुंबई मुक्कामी आले.