संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) संघर्ष ताणला गेलाय. निवडणूक आयोगासमोर (Central election Commission) शिवसेना (Shiv Sena News) या मूळ नावाऐवजी पर्यायी पक्षाचं नाव आणि चिन्ह सादर करण्यात आलं. यात शिंदे गटाकडून गदा, तलवार आणि तुतारी ही चिन्ह सादर केली जातील, असं बोललं जात होतं. मात्र ऐनवेळी शिंदे गटाने मोठी खेळी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाप्रमाणे शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांवर दावा केला असल्याची माहिती मिळतेय.
उगवता सूर्य आणि त्रिशूल या दोन चिन्हांसोबत ठाकरेंनी मशाल या चिन्हाचा पर्यायही निवडणूक आयोगासमोर दिलाय. अशातच आता ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केलाय.
फक्त चिन्हच नव्हे तर ठाकरे गटाप्रमाणेच शिंदे गटानेही एकाच नावावर दावा केल्याची माहिती मिळतेय. शिवसेना- बाळासाहेब ठाकरे या एकाच नावावर दोन्ही गटांकडून दावा केला जातो आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कोणाला कोणतं चिन्ह देतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
एकीकडे चिन्हाचा वाद असतानाच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टातही दाद मागितली आहे. याची सुनावणी आजच घेतली जावी, अशी शक्यता होती. मात्र ही सुनावणी आज होणार नसून उद्या होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आज चिन्हाबाबत निर्णय घेणार का, यावरही अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीला सामोरं जाताना शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांकडून खरी शिवसेना आपणच आहोत, असा दावा केला जात होता. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान, निवडणूक आयोगाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.
पोटनिवडणुकीला सामोरं जाताना ठाकरे आणि शिंदे यांच्यात चढाओढ सुरु होती. त्यातच चिन्हाच्या बाबतीतही आता शिंदे गटाने ठाकरेंनी जे पर्याय दिले होते, त्याच पर्यायांवर दावा करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. शिंदे गटाच्या या खेळीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. दोन्ही गटांकडून चिन्ह आणि नावांच्या पर्यायाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर निर्णय केव्हा होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.