शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांचा बळी, मंत्रिमंडळ विस्तारातून कुणाला डावललं जाणार?; दिल्लीवारीत काय घडलं?

| Updated on: Jun 30, 2023 | 2:05 PM

लोकसभा निवडणुका आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. इतर राज्यातील सुमार कामगिरी असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनाही डच्चू मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांचा बळी, मंत्रिमंडळ विस्तारातून कुणाला डावललं जाणार?; दिल्लीवारीत काय घडलं?
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावरील निकालात राज्यातील शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकारला अभय मिळाल्याने आता राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अचानक दिल्लीत गेल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. केंद्रातील महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या दोन मंत्र्यांचा शिंदे गटासाठी बळी जाणार याचीच चर्चा आता रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्लीत गेले. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते मध्यरात्री उशिरा मुंबईत आले. या नेत्यांनी सुमारे तीन ते चार तास अमित शाह यांच्याशी चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत जात आहे. अमित शाह यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र, त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. फक्त विस्ताराच्या चर्चाच होत आहे. मात्र, कालची शाह यांच्यासोबतची शिंदे आणि फडणवीस यांची चर्चा फायनल चर्चा होती असं सांगितलं जातं. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

वाचाळवीरांना डच्चू

शाह यांच्या बैठकीत शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदिल देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारमधील कामचुकार आणि वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. तशा स्पष्ट सूचनाच याआधी शाह यांनी शिंदे यांना दिल्या होत्या. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या विस्तारात मित्र पक्षांनाही स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रातील दोन मंत्र्यांना घरी पाठवणार

दरम्यान, शिंदे गटाला केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोघांचा समावेश केला जाणार आहे. त्या बदल्यात महाराष्ट्रातीलच दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मात्र, शिंदे गटासाठी बळी जाणारे हे दोन मंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर केंद्रात शिंदे गटाकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे ही गुलदस्त्यात आहे.

शेवाळेंशी चर्चा नाही?

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या विस्ताराबाबत शाह यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीच चर्चा केली. खासदार राहुल शेवाळे यांच्याशी कोणताही चर्चा केली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेतील पहिलं बंड एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालं. ते आमदारांचं बंड होतं. तर दुसरं बंड राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात झालं. ते खासदारांचं बंड होतं. त्यामुळे केंद्रातील विस्ताराबाबत शेवाळे यांच्याशीही भाजप चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसं काहीच घडताना दिसत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.