एकनाथ शिंदे (Ekanth Shinde News) गटातल्या आमदारांमागे अपघाताचं ग्रहण लागलंय की काय, अशी शंका कुणालाही येऊ शकते. कारण गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटना पाहिल्या, तर त्या काळजी वाढवणाऱ्या अशाच आहे. कुणी बंडखोर आमदारांच्या गाड्यांचे अपघात होत आहेत. आमदार थोडक्यात अपघातातून थोडक्यात वाचले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर एका आमदाराच्या तर चक्क घराचं छतच कोसळलं होतं. गेल्या दहा दिवसांत घडलेल्या या अपघातांमध्ये (Accident News) सोमवारी आणखी एका अपघाताची भर पडली होती. भरत गोगावलेंच्या गाडीचा मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस (Eastern Express Highway) हायवेवर अपघात झाला. यात गाडीचं नुकसान झालं. पण एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेले आणि महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले थोडक्यात बचावले होते. या अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या आहे. हे अपघातच आहेत ना? या अपघातांमागे घातपाताचा तर प्रकार नाही ना? अशी शंका कुणाला आली तर आश्चर्य वाटायला नको. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जेव्हापासून बंडखोर आमदारांचा गट महाराष्ट्रात दाखल झाला आहे, तेव्हापासून घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना बारकाईनं पाहण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. कारण गेल्या आठवडाभरात शिंदे गटातल्या 3 आमदारांच्या गाड्यांना अपघात झालाय. तर एका आमदाराच्या घराचं छत कोसळलंय. सोशल मीडियातही हा चर्चेचा विषय झालाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला होता. मुंबईत हा अपघात झाला. तारीख होती 5 जुलै. या दिवशी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी, 11 जुलैला मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांच्या गाडीचा अपघात झाला. एकूण सात गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर खुद्द भरत गोगावले यांनी आपल्याला कोणतीही दुखापत जालेली नाही, हेही स्पष्ट केलं. मंत्रालयात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता.
दिवस होता 6 जुलै. संजय शिरसाट यांच्या गाडी ताफ्यातील वाहन शिरसाटांच्याच वाहनाला धडकलं होतं. बंड यशस्वी झाल्यानंतर संजय शिरसाट आपल्या मतदारसंघात परतले होते. त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी औरंगाबादेत रॅली काढली. या रॅलीत 100 पेक्षा जास्त गाड्या होत्या. पण रॅलीदरम्यान शिरसाटांची गाडी समोरच्या गाडीला धडकली. पाठीमागून येणाऱ्या गाडीचीही शिरसाट यांच्या गाडीला धडक बसली.. अपघातानंतर शिरसाट चांगलेच संतापलेही होते..
शिंदे गटात असलेले आणखी एक आमदार म्हणजे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील. 7 जुलैला तारखेला शहाजीबापू पाटील मुंबईतल्या आमदार निवासात होते. पण शहाजीबापूंच्या समोरच खोलीचं छत कोसळलं. शहाजीबापू यातून अगदी थोडक्यात वाचले. काय ते आमदार निवास, काय ते छत, इथं सगळं नॉट ओके अशी म्हणण्याची वेळ शहाजीबापूंवर आली होती..
बंडखोर आमदार आणि त्यांच्या गाड्यांना झालेल्या अपघाताची मालिका यावरुन सोशल मीडियात चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवाय संजय राऊतांचं एक जुनं वक्तव्यही व्हायरल होऊ लागलंय. 50 खोके पचणार नाही, गुलाबरावांचा जुलाबराव होईल. थोड्या दिवसांत सगळ्यांना जुलाब सुरु होती. शिवसेनेशी बेईमानी करणं, हे चांगलं नाही असं म्हणताना संजय राऊतांनी बंडखोरांना इशाराच दिलेला होता.
आमदारांच्या वाहनांचे अपघात, संजय राऊतांची वक्तव्य आणि सोशल मीडियातील चर्चा, यांचा एकमेकांना सध्यातरी काहीही संबंध नसला, तरी या घटनांचं सत्र येत्या काळात असंच सुरु राहिलं, तर शंकेची जागा खात्रीने घेतली तर नवल वाटायला नको.