मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप झालेला आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलंय. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे अशावेळी एकनाथ शिंदे आणि राज्यपालांचा ऑनलाईन संवाद होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही शिंदे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या एकूण 43 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. या पत्रात शिंदे यांनी शिवेसना प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना जारी केलेला व्हीव बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचही त्यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.
या पत्रात दोन नियुक्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक म्हणजे एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील असा ठराव करण्यात आला आहे. त्याला भरत गोगावले आणि आणि महेश शिंदे यांनी अनुमोदन दिलं आहे. तर प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला संजय रायमुलकर यांनी अनुमोदन दिलं आहे. या पत्रात 34 आमदारांच्या सह्या आहेत.