संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः शिंदे भाजप (Shinde-BJP) पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलं. त्यामुळे रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात. हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे-भाजप सरकार 100 टक्के पडणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.
सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.
त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
येत्या काही दिवसात शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य रंगणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा दावा आहे की काय, असं म्हटलं जातंय.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत प्रथमच दिल्लीत गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मी त्या संदर्भात नव्हे तर माझ्या वैयक्तिक कामांसाठी आल्याचं राऊतांनी सांगितलं. तसेच मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत म्हणालेत.