मुंबई : शिवसेनेचे परभणीचे नाराज खासदार संजय जाधव यांचं राजीनामा नाट्य संपलं आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी संजय जाधव नाराज नसल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी राजीनामाच दिला नाही, त्यामुळे तो मागे घेण्याचाही विषय येत नसल्याचं म्हटलं (Eknath Shinde on resignation of Shivsena MP Sanjay Jadhav).
एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्यासमोर खासदार संजय जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. त्यांची कामे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी कुठे जाणवली नाही. त्यांनी कुणाकडे राजीनामा दिला? त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कुठलीही तक्रार किंबहुना नाराजी नोंदवलेली नाही. त्यांच्या मतदार संघातील कामे-विषय मुखमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनाही आपल्या खासदाराच्या कामाबाबतीत काही सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
“ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत किंबहुना दुसऱ्या पक्षाचे खासदार आहेत त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे सूत्र ठरले आहे. त्याप्रमाणे खासदार संजय जाधव यांच्याबाबत निर्णय करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या आहेत. संजय जाधव यांची कुणावरही नाराजी नव्हती आणि तशी नाराजी असण्याची कारणंही नाही. मी तिथे होतो. त्यांनी राजीनामा दिलाच नाही, त्यामुळे मागे घेण्याचा विषयच येत नाही. त्यांचा राजीनामा माध्यमांकडे कुठून आला माहित नाही.
खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले होते?
“जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील 8 ते 10 महिन्यांपासून आपल्याकडे पाठपुरावा करीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कशी-बशी समजूत काढून तथा मी ही शांत बसलो”, असं संजय जाधव पत्रात म्हणाले.
“दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसेनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मसा मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते”, असं संजय जाधव म्हणाले.
“शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही. या मताचा मी आहे. शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल?”, असा सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला.
“जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. मात्र, मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणून काय न्याय देऊ शकेल? असा प्रश्न मला पडला आहे”, असं मत संजय जाधव यांनी पत्रात मांडलं.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करुनही दुसऱ्यांदाही राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन:च्छ अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहे. खासदाक म्हणून मी जर कार्यकर्त्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांती आणि राजखुशीने मी खासदार पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेन. तरी माझा खासदारकीचा राजीनामा मंजूर करावा, ही विनंती”, असं संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवेलल्या पत्रात म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा
Eknath Shinde on resignation of Shivsena MP Sanjay Jadhav