मुंबई : काल महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा एक अंक काल पूर्ण झालाय. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं अन् आता राज्याच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरु झालाय. या अंकाच्या केंद्रस्थानी आहेत, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे… या दोघांच्या भोवती हा अंक रचला जाणार आहे. पण या सगळ्या आधी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली तेव्हा ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘उद्धवसाहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे’, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काहीही झालं तरी उद्धव ठाकरे दुखावायला नको, असं दीपक केसरकर म्हणाले. “सत्तेसाठी आम्ही काहीही केलेलं नाही. मी खोटं बोलत नाही. आम्ही तात्विक भूमिका बाजूला न ठेवता हे सगळं घडलं पाहिजे.उद्धव साहेब कुठेही या दुखावले गेले नाही पाहिजे.दह- दहा लोकं जेव्हा एकावेळेला बोलतात, तेव्हा अपमान होऊ शकतो. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. ते होऊ नये म्हणून काळजी घेतोय. कुणाचंही मन दुखवायचं नसतं. ते तथ्य आम्ही जसं पाळतो, तसं तुम्हीही पाळलं पाहिजे. तुम्ही जर सत्तेवर येत असाल, तर त्यांना थांबवलंही पाहिजे”, असं म्हणत दीपक केसरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“सत्ता स्थापना करताता आम्हाला आमच्या नेत्याला दुखवायचं नाही. भावनांची कदर ठेवली पाहिजे. शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा विचार येतो, ठाकरेंशी असलेलील बांधिलकी येते, प्रत्येक गोष्ट येते… कुठलाही मनुष्य आपोआप मोठा होत नाही. आम्ही तत्त्वांवर बोलतो. पवार साहेबांची आमची विचारांची लढाई आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जो लढा द्यायचा होता, तो दिला”, असंही ते म्हणाले.
“सत्ता स्थापना होणारच आहे. ते कधी होणार ते शिंदे किंवा फडणवीस साहेब सांगतील. शिंदे साहेब सगळ्यांना विचारुनच मग निर्णय घेतात. याचं खरंच कौतुक आहे. आमचं म्हणणंय की तुमचे हे चार प्रवक्ते आहेत, तर ते बोलतील. बाकी कुणी नाही बोलणार.. आम्ही बाळासाहेबांकडे आणि त्यांच्या विचारांकडे पाहून आलो.एकनाथ शिंदे आज मुंबईत येऊ शकतील. पण अजून काही नक्की झालेलं नाही. आम्ही मुंबईत केव्हा येणार आहोत, ते तुम्हाला आम्ही कळवतो… शिंदे साहेब किंवा मी कळवेल… आमच्यातून कुणीही असं बोलणार नाही, की कुणी दुखावलं जाईल”, असं केसरकरांनी सांगितलं.
फडणवीसांचं असं म्हणणंय की मी आधी माझ्या लोकांशी बोलेन आणि त्यानंतर पुढची पावलं टाकेन.. आमची बैठक गोव्यात आहे. आमचा गट नाही.. सरकार येतात, सरकार जातात. विचार कसा टिकवायचा, हा महत्त्वाचा भाग आहे. मंत्रिपदं असणारी लोकं कशाला बंड करतील.. केवळ याच्याकडे बंड म्हणून बघू नका.. केवळ सत्तेसाठी केलेलं हे बंड नाही.. पक्षात काही घडलं असेल, तर तो एक वेगळा विचर आहे.. शिंदे साहेबांसोबत चर्चा फक्त सरकारच्या स्थापनेबाबत होत नाही.. आपण ज्या विचाराने चाललोय, तो विचार मागे पडला, तो मग हे सगळं कशाला..
भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत तुमचं नेमकं म्हणणं काय? असं विचारण्यात आलं तेव्हा आम्ही आता उघड नाही करु शकत. आमचा साधारण सूर असा आहे, की काल आम्ही टीव्हीवर जे पाहिलं, शिंदे साहेबांच्या घरासमोर कुणी रिक्षावाला काही करत असेल, किंवा कुणी मॅच्युर नेता असेल, तर त्यांनी बोलताना भान बाळगावं..मर्यादा आणली पाहिजे. बोलायचं असेल तर ही ठराविक लोकं बोलतील. त्यांच्या बोलण्यात संयम असला पाहिजे, असं त्यांनी सांगतिलं.
भाजपच्या गोटात जो काही जल्लोष झाला, त्यांच्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया दिसल्या, त्याने दुखावले जाणारच ना.. आम्ही बंड राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात बंड केलं होतं… आमच्या नेत्याच्या विरोधात बंड केलेलं नव्हतं.. फडणवीस मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. मला एक सांगायचंय की चुकीची स्टेटमेन्ट थांबली पाहिजेत, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.