Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सुरतला रवाना, उद्धव ठाकरेंचा नेमका निरोप काय?

| Updated on: Jun 21, 2022 | 3:39 PM

शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक यांना शिंदेंच्या भेटीसाठी सूरतला पाठवलं आहे. ते काही वेळातच सूरतमध्ये पोहोचून शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सुरतला रवाना, उद्धव ठाकरेंचा नेमका निरोप काय?
उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सूरतमध्ये दाखल
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) भाजपनं आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलं. या निवडणुकीत उमेदवार काँग्रेसचा पडला, पण भूकंप शिवसेनेत झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेते मातब्बर नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा अधिक आमदार घेऊन सूरतमधील लि मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर रात्रीतूनच शिंदे सूरत मुक्कामी पोहोचले. अशावेळी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक यांना शिंदेंच्या भेटीसाठी सूरतला पाठवलं आहे. ते काही वेळातच सूरतमध्ये पोहोचून शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंचा निरोप काय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता. भाजपसोबत सरकार स्थापना, फडणवीस मुख्यमंत्री आणि स्वत: उपमुख्यमंत्री असा तो प्रस्ताव होता. मात्र, शिंदे यांचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतमध्ये पोहोचले आहेत. ते उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळला

शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी तडजोडीकरिता मोठा प्रस्ताव ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केल्याची माहिती हाती आली आहे.

  •  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत
  • मी (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री व्हावेत
  •  शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं
  • आम्ही सर्व आमदार शिवसेनेतच राहणार

एकनाथ शिंदेंची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी

एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. चौधरी यांची गटनेतपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.