मुंबई : राज्यात नवं मंत्रिमडळ (Maharashtra Cabinet) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटातून आणि भाजपकडून काही मोठी नावं सध्या चर्चेत आहेत. मंत्रिपदासाठी रेसही आता फरारी कारच्या रेससारखी वाढली आहे. प्रत्येकजण आपल्या कॅबिनेट मंत्रिपद आणि चांगलं खातं मिळावं यासाठी धावाधाव करताना दिसून येत आहेत. भाजपकडून काही संभव्य नावं चर्चेत आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रवीण दरेकर, मनिषा चौधरींना या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र नेहमीप्रमाणे पुन्हा एका नावाची या सर्व नावांपेक्षा जास्त चर्चा आहे आणि सर्वात जास्त चर्चेतलं ते नावं आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं, त्यांंना आता तरी संधी मिळणार का? असा सवाल कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक हरल्यावर पंकजा मुंडे या अजूनही पुन्हा संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जशा जसा निवडणुकी लागतील त्यावेळी पंकजा मुंडे यांचं नावं अनेकदा चर्चेत आलं. मात्र पंकजा मुंडे यांना अनेकद डावलंही गेलं. आता अलिकडेच राज्यसभेच्या निवडणुका लागल्यावरही पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्लॅन असल्याच्या चर्चा समोर आल्या. मात्र भाजपकडून जी यादी आली त्यात यावेळी पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं. मात्र राज्यसभेपाठोपाठच विधान परिषदेच्या निवडणूका लागल्या असल्याने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते, असे अंदाज लावण्यात आले. मात्र त्याही यादीत पंकजा मुंडे यांंचं नाव नव्हतं. त्यामुळे पुन्हा पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.
पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेवर भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली. तसेच राज्यसभेवर त्यांना डावलून अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांना पाठवण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाटही पाहायला मिळाली. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. तसेच एका कार्यकर्त्यांने तर आत्मदहनचाही प्रयत्न केला. या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली.
आता राज्यात पुन्हा मोठं सत्तांतर झालं आणि पंकजा मुंडेंचं नाव हे पुन्हा चर्चेत आलं. भाजपकडून विधान परिषदेसाठी नवी यादी ही राज्यपालांना दिली जाणार आहे. त्यात पंकजा मुंडेंचं नाव असणार का? तसेच आता नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना संधी देऊन आता तरी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न होणार का? असे अनेक सावल सध्या राज्याच्या राजकारणात विचारण्यात येत आहेत. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात सधी दिली जाणार का? हाही सस्पेन्स कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे.