जळगाव | 12 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला निकाल दिला आहे. या निकालात राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ज्याला पक्षाची घटना माहीती नाही तो काय पक्ष चालविणार असा सवाल केला आहे. आम्ही कोणतीही गद्दारी केलेली नाही. आम्ही पक्ष आणि पक्षाचे विचार वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर अन्याय झाला आहे. आपण यासाठी जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रीया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की कुठला अन्याय झाला आहे ? उलट पक्ष वाचविण्याकरिता आम्ही 40 लोकांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्याला महत्व दिलं नाही. या गोष्टींचा विचार उद्धव ठाकरे यांनी करायला हवा होता, मात्र त्यांनी केला नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कितीही जनतेमध्ये फिरले तर त्यांना आमच्याबद्दल लोक हेच सांगतील की आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही पक्ष वाचवला आहे असे पाटील यांनी म्हटले आहे. ज्यांनी आमच्यावर वेगवेगळे आरोप केले, त्या आरोप करणाऱ्यांना हा निकाल म्हणजे चपराक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी आमदार अपात्र निकाल प्रकरणात शरद पवार गटाला लाभ मिळायला हवा असे म्हटले आहे. याबद्दल विचारता गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. राष्ट्रवादी फुटली नाही असे ते म्हणत आहेत, मात्र जी भूमिका आम्ही शिवसेनेत घेतली तिच भूमिका अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतल्याचेही त्यांनी सांगितले. मला उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची गरज नाही. पण, संजय राऊत यांच्यासारखं भूत आता उद्धव ठाकरे यांनी आवरावे असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले.