मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या (Rebel Eknath Shinde News) बंडखोरीनंतर गुवाहाटीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज दुपारी ठीक दोन वाजता शिंदे गटाची आसामच्या गुवाहाटीत बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पन्नास आमदारांचं समर्थन आपल्याकडे आहे, असा दावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde Live Updates) यांनी केलंय. दुसरीकडे सकाळी ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी (MVA government News) सरकारला घेरलंय. आमदारांची आणि त्यांच्या घराची सुरक्षा काढून घेतल्यामुळे शिंदे यांनी पत्र लिहून ही सरकारचं हे पाऊल म्हणजे राजकीय आकस असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकीकडे मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होतेय. तर दुसरीकडे गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्येही शिंदेट गटांत चर्चा होईल. या बैठकीत चार महत्त्वाचे मुद्दे चर्चेला असणार आहे. हे चार मुद्दे नेमके कोणते, त्यावर एक नजर टाकुयात..
शिवसेनेनं बंडखोरी केलेल्या 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. निलंबनाची ही मागणीच अवैध आहे, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांकडून केला गेलाय. त्या पार्श्वभूमीवर कायदेशीर बाबी आणि नियमांवर शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा होतील. शिवसेनेच्या निलंबनाच्या कारवाईला काय उत्तर द्यायचं, त्याला कसं सामोरं जायचं, यावर रणनिती ठरवली जाईल.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्टपणे आता ही कायदेशीर लढाई असल्याचं म्हटलंय. तर दुसरकडे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीही आम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाकडून केला जातोय, असा आरोप करण्यात आला. या कायदेशील लढाईसाठी आतापासून शिंदे गटाला तयारी करावी लागणार आहे. तांत्रिक दृष्ट्या आतापर्यंत फक्त अविश्वास ठराव आणि पुढची कायदेशीर लढाई कशी लढायची, याची व्यूहरचनाही बैठकीत आखली जाऊ शकते.
देवेंद्र फडणवीसांची जेपी नड्डांसोबत झालेली बैठक असेल किंवा मग सागर बंगल्यावर घडत असलेल्या भाजपच्या गोटात बैठकांचं सत्र असेल, युतीमध्ये ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे. त्यामुळे महाशक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जातोय, त्या भाजपसोबत चर्चेला कधी सुरुवात करायची? याबाबतही चर्चा होईल. चार दिवस संयम बाळगा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना दिलेलं होतं. त्यामुळे याच चार दिवस महत्त्वपूर्ण चर्चा आणि सत्तास्थापनेच्या वाटाघाटींची बोलणी सुरु होण्याचा अंदाज वर्तवला जातोय.
शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे महत्त्वाचे निर्णय घेतील, असं सांगितलं जातंय. शिवसेनेच्या घटनेतही काही महत्त्वाचे बदल करण्याबाबत या बैठकीत काय ठरतं, यावर शिंदे गटाचं बारी लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर आपली रणनिती काय ठरवायची? याबाबतची याच बैठकीत चर्चा होऊ शकते.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे झालेल्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde News, Cm Uddhav Thackeray LIVE