मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे अजून चार आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकड थेट गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिवसेनेच्या ढाण्या वाघ अशी ओळख असलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह योगेश कदम, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित गुवाहाटीत दाखल झाले आहेत. तिथे या चारही आमदारांचं एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं.
गुलाबराव पाटील यांच्यासह गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांचं एकनाथ शिंदे आणि तिथे उपस्थित आमदारांनी स्वागत केलं. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे हे आमदारांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यावेळी गुलाबराव पाटील आणि अन्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी तिथे उपस्थित सर्वच आमदारांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि आनंद पाहायला मिळत होता.
तत्पूर्वी गुलाबराव पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं होतं. पक्षातील फूट टाळण्यासाठई भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सर्व आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय.