मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गट मुंबईत येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय. मु्ंबईत यावं तर लागेलच, असं वक्तव्य त्यांनी केलंय. ज्या काही विधीमंडळाच्या कायदेशीर प्रक्रिया आहेत, त्यासाठी यावं तर लागेलच, असं त्यांनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गटाला 24 तासांत मुंबईत येण्याचं आवाहन केलं होतं. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar on Eknath Shinde) यांनीही गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठं वक्तव्य केलं होतं. गुवाहाटीमध्ये गेलेल्या आमदारांना मुंबईत यावंच लागेल. कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईत आल्यानंतर शिवसेनेकडे सरकार वाचवण्यासाठी बहुमत असेला, असा विश्वासह संजय राऊत यांच्या पाठोपाठच शरद पवारांनीही व्यक्त केला होता. याबात एकनाथ शिंदे यांचा टीव्ही 9 कडून विचारणा करण्यात आली.
मुंबईत येणार का, यावर बोलताना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की…
‘घाबरतो थोडीच, विधीमंडळाच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी यावं लागेलच, ज्या काही विधीमंडळाच्या बाबी असतील, पुढच्या ज्या काही नियमानुसार बाबी कराव्या लागतील, त्या तर कराव्याच लागतील. त्याच्यामध्ये कायं एवढं’
शिवसेना आमदारांना मुंबई येण्याचं आवाहन केलं जातंय. एकनाथ शिंदे यांनी फोडलेले शिवसेनेचे 37 आमदार सध्या आमच्यासोबत असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला शेवटपर्यंत साथ देऊ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. तसंच बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईत आमदारांना यावं लागेलच, असंही संजय राऊतांनी म्हटलं होतं. सध्या गुवाहाटीमध्ये गेलेले आमदार हे दबावाखाली गेले आहेत. त्यांना फसवून घेऊन जाण्यात आलं आहे, असाही आरोप संजय राऊत यांनी केला होता.
एकनाथ शिंदे यांनी एकीकडे 37 आमदारांच्या सहीचं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. यामुळे राजकीय पेचप्रसंग अधिक गुंतागुतीचा होत असल्याचं पाहायला मिळतंय.
मुळात शिवसेना आमदार सूरतमध्ये असतानाचा शिवसेनेच्या आमदारांना संपर्क करणं, त्यांच्या बोलणी करणं शक्य होत होतं. ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे थेट आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचले. शिवसेना आमदारांशी जर पक्षाकडून सातत्यानं आणि सहज संपर्क होऊ शकला, तर बंडखोरी धोक्यात येऊ शकते, अशी भीती असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे बंडखोरी केलेले आमदारांना मुंबईत येण्याचं आवाहन शिवसेना पक्षाकडून केलं जातंय. तर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबईत येण्याचा कोणताही निर्णय एकनाथ शिंदे गट घेईल, अशी शक्यता नसल्याचं दिसतंय.
वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE