मुंबई : बंडखोरी केल्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांसह विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवलं. आपण गटनेते असल्याचा दावा केला. तर भरतशेट गोगावले (Bharatshet Gogavale) प्रतोद असल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या या पत्रावर शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याचाच अर्थ आता पक्षांतरबंदी कायद्याचं कोणतंही भय एकनाथ शिंदे यांना नसणार आहे. उलट उद्धव ठाकरेंच्या अडचणी या पत्रावरील 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता मातोश्रीवरील घडामोडींकडे सगळ्यांची नजर लागली आहे. शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं आहे.
23 जून रोजी पाठवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या या पत्रावर सही करणारे 37 आमदार कोण आहेत, त्यावर एक नजर टाकुयात..
एकनाथ शिंदे गटाला महाविकास आघाडीत राहायचं नाही. त्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे जोपर्यंत मविआतून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही मुंबईत येणार नाही, असंही ते म्हणालेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा वेळी आता नेमकी राजकीय समीकरणं काय तयार होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडून 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. निलंबन करण्यात यावं, या मागणीसाठी करण्यात आलेल्या 12 आमदारांमध्ये नेमक्या कुणाकुणाची नावं आहेत, त्यावरही एक नजर टाकुयात…
एकनाथ शिंदेंसोबतच समर्थक आमदार शिवसेनेच्या पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्या कारणामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यातही आलं आहे.