मुंबईः विधानसभेत दोन तृतीयांश आमदारांचा गट जमवून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून देणारे एकनाथ शिंदे आता शिवसेनेला दुसरा हादरा देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या खासदारांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार शिंदेगटात शामिल होण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेत शिवसेनेचे एकूण 18 खासदार (Shivsena MPs)आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंगे गटात शामील झाल्याची खात्रीलायक बातमी सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील आमदारांच्या बंडानंतर उरली-सुरली शिवसेना सांभाळण्याचं आणि उरलेले लोक फुटू न देण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यातच आता खासदारांची बंडाळी उफाळून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आणखी मोठं संकट उभं राहू शकतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या दिशेनं एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदारांची बैठक झाली. यात शिवसेनेच्या 18 पैकी 6 लोकसभा खासदार शिंदे यांच्या बैठकीत होते, अशी खात्रीशीर माहिती हाती आली आहे. यात पुढील आमदारांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेत शिंदे गटाने दोन तृतीयांश आमदारांचा गट तयार केल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या कमी झाली तर शिवसेनेची संसदेतील ताकद कमी होईल. लोकसभेतील त्यांचं गटनेतेपदही हिरावलं जाईल. एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढेल. तसेच आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाकडून केला जाईल. या सर्वांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील. राज्यभरातील शिवसेनेत उभी फूट पडल्याने आगामी निवडणूक लढवणंही त्यांना कठीण होऊन बसेल. या खच्चीकरणानंतर पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं संकट उद्धव ठाकरेंसमोर उभं राहिल.
उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन भाजपशी युती करावी, असे आवाहन शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि नेत्यांनी याकरिता अद्याप यासाठी तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.