मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नाराज नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडामुळे अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. शिंदेंची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सुरतमध्ये गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन त्यांना भेटण्यासाठी ते सुरतमध्ये आहेत. मात्र, यावेळी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोन्ही बडे नेते बराच वेळ ली मेरिडिअन हॉटेलबाहेर ताटकाळत थांबल्याचं दिसून आलं. यावेळी नार्वेकर हे सारखं कुणालातरी फोन करताना दिसून आले. दरम्यान, गुजरात पोलिसांचं संरक्षण असलेल्या शिंदे गटातील कोणतीही व्यक्ती हॉटेलखाली लवकर आल्याचं दिसलं नाही. तर यावेळी पोलिसांनी नार्वेकरांच्या गाडीची दिशा चुकवली. त्यानंतर पुन्हा नार्वेकरांची गाडीस पुढे जाऊन मागे आली. यावेळी गुजरात पोलिसांनी गाडी अडवल्याचंही दिसून आलं.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या बैठकीत हा निर्णय झाला, त्या ठिकाणी शिवसेनेचे बहुसंख्य आमदार उपस्थितच नसल्याचा दावा करण्यात येते आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेते पदावरुन शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शिवसेना आमदारांचे संख्याबळ कुणाकडे किती आहे, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा वाद चिघळत राहणार असल्याची शक्यता आहे.