मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारण मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांसह तब्बल 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर शिंदे यांच्यासोबत असलेले काही आमदार परतण्यास इच्छूक आहेत. त्यांना फसवून गुवाहाटीला नेण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून करण्यात येत आहे. आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय बांगर हे शिंदे गटातून परत आले आहेत. अजूनही काही आमदार परत येण्याच्या तयारीत आहेत, असंही सांगितलं जात आहे. शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) हे देखील परत येण्यास इच्छूक आहेत. चंद्रकांत खैरे हे एबीपी न्यूज नेटवर्कशी संवाद साधत असतानाच रमेश बोरणारे यांचा त्यांना फोन आला आणि खैरे यांनी मध्यस्थी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
चंद्रकांत खैरे हे बोलत असतानाच त्यांना रमेश बोरणारे यांचा फोन आला. त्यावेळी खैरे यांनी बोरणारेंची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसंच तुम्ही कधी येणार आहात, मी तुम्हाला उद्धवसाहेबांकडे घेऊन जातो, असं चंद्रकांत खैरे बोरणारेंना म्हणाले. तेव्हा बोरणारे यांनी खैरेंकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली. तेव्हा खैरे यांनीही त्यांची मागणी मान्य केली. खैरे यांनी तिकडे काही चाललंय असा प्रश्नही विचारला. तेव्हा बोरणारे म्हणाले की, काही नाही चहा नाष्टा गप्पा असं सुरु आहे. तेव्हा खैरे यांनीही मस्करीच्या सुरात चहा, नाष्टा, रात्री ऑर्केस्ट्रा वगैरे काही सुरु आहे का? असं विचारलं. तेव्हा नाही साहेब असं काही नाही, असं बोरणारे यांनी सांगितलं.
खडसे पुढे म्हणाले की हॉटेलचं जेवण किती दिवस करणार? पोट बिघडतं हॉटेलच्या जेवणाने. तेव्हा बोरणारेही हसले. तसंच मध्यस्ती करा अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा खैरे म्हणाले की तुम्ही या, मी तुमच्यासाठी मध्यस्ती करतो. मी तुम्हाला घेऊन जातो उद्धव साहेबांकडे. कितीजण येणार तुम्ही सांगा? असं खैरे यांनी विचारलं. तेव्हा सगळ्यांसाठीच मध्यस्ती करा, असं बोरणारे म्हणाले. त्यावेळी सगळ्यांसाठी नाही आता आपल्या जिल्ह्यातील किती आमदार येता ते सांगा, मी करतो मध्यस्ती, असा विश्वास खैरे यांनी बोरणारे यांना दिलाय.