मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात भाजप आणि शिंदे गटाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि संध्याकाळी साडे सात वाजता त्यांचा शपथविधी होईल अशी घोषणाच फडणवीस यांनी केलीय. फडणवीसांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. मात्र, फडणवीस यांच्या निर्णयामागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दोन भाषणं कारणीभूत असल्याचं असल्याचं आता बोललं जातंय. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेच्या लढाईत एकनाथ शिंदे यांना मोठी संधी मिळाल्याचं आज पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली. शिवेसनेचे तब्बल 39 आणि एकूण 50 आमदार शिवसेनेसोबत राहिले. एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटातील आमदार या बंडाळीमागे भाजपचा हात नसल्याचं सांगत असले किंवा भाजप नेतेही हा आरोप फेटाळत राहिले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत पुन्हा येण्यासाठीच शिंदे यांच्या बंडाला साथ दिल्याचा आरोप शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते करत होते. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या सर्व नाट्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता.
या सत्ता संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. दोन्ही वेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही. बंडखोर आमदारांनी मला फक्त समोर येऊन बोलावं, मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं आवाहन करत जनतेच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले होते. तर फडणवीस यांची प्रतिमा फोडोफोडीचं राजकारण, सत्तापिपासू अशी करण्यात त्यांना यश मिळालं होतं. मात्र फडणवीस यांनी आज मारलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे उद्धव ठाकरे यांचं प्रतिमाभंजन केलंय. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचा संदेश देत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडी केलीय.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. तुमचं जे काही म्हणणं आहे ते समोर येऊन बोला. मला सत्तेचा मोह नाही. मी आता मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. फक्त बंडखोर आमदारांनी समोर येऊन मला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको असं सांगावं. इतकंच नाही तर मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मान्य नसेल तर शिवसैनिकांनी मला सांगावं, मी मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
तर राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत खंत व्यक्त केली होती. मी मुख्यमंत्रीपदाचा काय फायदा करुन घेतला मला सांगा. आम्हाला आता जे काही मिळालं, जे मंत्रिपदं शिवसेनेत मिळाली आहेत, जो काही मोकळेपणा शिवसेनेनं दिलाय. मी कुणाच्याही खात्यात लुडबूड केली नाही. हे स्वातंत्र्य तुम्हाला भाजपमध्ये मिळत असेल आणि तुमच्यापैकी कुणाला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर जरुर जा. आणि उपमुख्यमंत्रीच होणार असाल तर मला सांगायचं होतं, केलं असतं तुम्हाला उपमुख्यमंत्री, असंही उद्धव ठाकरे आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही फेसबुक लाईव्हमधील संबोधनातून त्यांची जनमानसात मोठी प्रतिमा तयार झाली होती. तर फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा तयार करण्यातही त्यांना यश आलं होतं. मात्र, आता या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेच्या लढाईत तिसऱ्याला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना शिंदे यांना संधी मिळाली हे मात्र निश्चित.