मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. शिंदे यांच्यासोबत तब्बल 50 आमदार असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडी सरकार टीकणार असा दावा शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र, राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिलेत. जालन्यातील एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. तेव्हा टोपे यांच्यासमोरच दावनेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
रावसाहेब दानवे म्हणाले की, टोपेसाहेब अजून मी दोन तीन दिवस विरोधी पक्षात आहे. त्यामुळं माझी बाजू मी तुमच्यापुढं मांडली पाहिजे. आज वर्तमानस्थितीत मी विरोधी पक्षात आहे राज्यात, त्यामुळे मी माझी भूमिका मांडली पाहिजे. या जिल्ह्यात काय सुरु आहे ही तुमची आणि माझीही जबाबदारी आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये काय चाललंय? ऑफिस नवं बांधलं, याचा अर्थ ऑफिसमधला कारभार चांगला चालला का? या मताशी मी सहमत नाही. मग ते जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी ऑफिस किंवा कृषी अधिकारी कार्यालय असूद्या, आपली जबाबदारी आहे, आपण राज्यकर्ते आहोत, आपलं केवळ ऑफिसमध्ये बसून काम करणं ही जबाबदारी नाही. आपण कधी कधी लोकांमध्ये जाऊन लोकांचा आवाज ऐकला पाहिजे, की लोकांचं काय मत आहे?
‘आता मला सांगा, तुम्ही आणि मी दोघांनी एक दिवस कार्यक्रम केला. पंतप्रधानांनी सांगितलं कार्यक्रम करा. त्यात मला दर अशी सूचना असती, की अशाप्रकारचं राजकारण काही ठिकाणी केलं जाईल. कृषी अधिकाऱ्यावर ही जबाबदारी होती की लाभधारक शेतकरी असतील त्यांना एकत्र करा. पण भीतीपोटी की हे शेतकरी आमच्या तक्रारी करतील म्हणून कृषी अधिकारी आणि खात्यातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बोलावलं नाही. जे कुणी दोन चार आले असतील त्यांनी या मॅडमच्या तोंडावर सांगितलं की आमच्याकडे पैसे मागितले. जर अधिकाऱ्यांसमोर, केंद्रीय मंत्र्याच्या हजेरीत लाभधारक उठतो आणि या अधिकाऱ्यानं पैसे मागितले असं सांगतो. त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आपल्यासमोर दुसरी कोणतीही नाही’.
दानवे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात खासदाराला खासदाराचा, आमदाराला आमदाराचा, मंत्र्याला मंत्र्याचा मान द्या. आमचं उद्घाटन पत्रिकेत नावच नसतं. काय प्रोटोकॉल समजत नाही का अधिकाऱ्याला? टोपेसाहेब मला बोलले म्हणून मी आज आलोय. म्हणजे उद्घाटन आज आणि सकाळी फोन येतोय उद्घाटनाचा. साहेब अधिकाऱ्याचं काम आहे येऊन पत्रिका देणं, इतका निर्लज्ज अधिकारी कोण आहे ओ फोनवर बोलतो. आम्हीही 35 वर्षे अधिकारी पाहिलेत. फोनवर निमंत्रण देतो अधिकारी? ही काही चांगली पद्धत नाही ती मोडून काढा. सरकारं येतील, जातील त्याबाबत आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्हाला तर चांगलंच विरोधी पक्षात असं बोलायला भेटतं. दोन-तीन दिवसांत हे सुद्धा बंद होणार आहे, असं सूचक वक्तव्य दानवे यांनी केलंय.