मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळतोय. शिवसेनेचे जवळपास 26 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या लि मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) गोटात मोठी खळबळ माजलीय. एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी आता शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करावं, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री तर स्वत: उपमुख्यमंत्री असा तो प्रस्ताव असल्याचं कळतंय. मात्र, शिवसेनेकडून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि शिंदे यांच्या भेटीसाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना सूरतमध्ये पाठवण्यात आलंय. तिथे जवळपास तासभर नार्वेकर, फाटक आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर काय होणार? शिंदे यांचं बंड थंड होणार की महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याबाबतच्या पाच शक्यता सध्या चर्चेत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 26 आमदार असल्याची माहिती मिळतेय. त्याच बळावर शिंदे यांनी शिवसेनेला एक प्रस्ताव पाठवल्याचं कळतंय. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करावं, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. तर उपमुख्यमंत्रीपद माझ्याकडे देण्यात यावं, असा तो प्रस्ताव आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेनेकडून हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती मिळत आहे. पण नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांच्या शिंदेंसोबतच्या बैठकीत या प्रस्तावाबाबत मध्यममार्ग निघतो का? आणि शिवसेनेतील उभी फूट रोखली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांचा निरोप काय? शिंदे यांचा प्रस्ताव मान्य केला जाणार का? शिंदेंची मनधरणी करण्यात शिवसेना यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर शिंदे यांचं बंड मोडित निघणार की कायम राहणार हे स्पष्ट होईल.
दुसरीकडे भाजपच्यटा गोटातील हालचाली आणि राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडी वाढल्या आहेत. त्या पाहता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन भाजप महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करुन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
आज संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सूरतवरुन गांधीनगरला नेलं जाण्याची शक्यता आहे. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. तिथे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपची रणनिती आखली जाणार, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
शिंदे यांचं बंड कायम राहिलं, त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनीही भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला, तर राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीतील नाराजी आणि मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत. अशावेळी राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येणार, असं बोललं जात आहे.