मुंबई : नाराज एकनाथ शिंदेंनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरचं शिवसेनेचं (Shivsena) नाव हटवलं आहे. यामुळे शिंदेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडाळीमुळे अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेच्या वेळेस गटनेता बनवलं होतं. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदेंची नाराजी दिसून आली होती. मध्यंतरी राष्ट्रवादीवर (NCP) नाराज असलेल्या शिंदेंनी थेट बंडाळी केल्याचं दिसतंय. आता शिंदेंनी त्यांच्या ट्विटरवरुन थेट शिवसेनेचं नाव दूर केलंय.
एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केलंय.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
अर्थातच प्रखर हिंदुत्ववादी विचार असलेल्या शिवसेनेनं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अगदी विरोधी विचारांचे पक्ष शिवसेनेसोबत सत्तेत बसले. मात्र, यामुळे शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली. वर्षांनुवर्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांना अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांशी जुळवून घ्यावं लागलं. यावरुन तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वारंवार वादही दिसून आले. शिवसेनेनं वेळोवेळी आपली भूमिकाही बदलली. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्ववादी विचारांचे आमदार शांत तरी कसे बनणार, यानंतर वाद वाढतच गेला आणि आजअखेर एकनाथ शिंदेंना बंड करण्याची वेळ आल्याचं बोललं जातंय. यामुळे शिंदे यांनी ‘बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’असं म्हटलं आहे.