सावंतवाडी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) कार्यालयावर हल्ल्याची मालिका सुरु झालीय. मुंबईत मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, पुण्यात तानाजी सावंत, उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांची कार्यालये शिवसैनिकांनी फोडली आहेत. आता शिंदे गटातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याही कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय. दीपक केसरकर यांनी काही तासांपूर्वीच पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर संध्याकाळी केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केलाय. दरम्यान, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. ज्या राष्ट्रवादीने आमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या खासदारांनाही त्रास दिला गेला. अशास्थितीत शिवसेनेचं अस्तित्व टिकावं यासाठी हा निर्णय घेतलाय. आज राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचं बहुमत संपलेलं आहे. त्यामुळे त्या अशा युक्त्या वापरू शकतील. जे काही कुणाशी बोलायचं असेल त्याचे अधिकार शिंदे साहेबांना दिले आहेत. शिंदे साहेब आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेतच. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा तो ते घेतील. पण कुठल्याही स्थितीत आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय.
आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पण विषय दुसराच निघतो. आम्ही विनंती काय केली की शिवसेना-भाजपनं एकत्र यावं, ते काय म्हणतात की मी राजीनामा देतो. पण राजीनामा कुणी मागितलाच नाही. लोकांना भावनिक करण्याचं काम सुरु आहे, असं होऊ नये. शेवटी ते नेते आहेत. त्यांनी बाळासाहेबांनंतर पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे, असंही दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितलं.