मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना देणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोन तृतीआंश शिवसेना (Shiv Sena) आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हेही स्पष्ट आहे. दरम्यान, याबाबत जेव्हा भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाल पाठिंबा देणार असं जरी म्हटलं, तरीदेखील भाजप तूर्तास तरी वेट एन्ड वॉच, अशी भूमिका असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार करुन नंतर पक्ष निर्णय घेईल, असंही त्यांनी म्हटलंय.
अडीच वर्ष महाविकास आघाडीने जनतेचा घात केला. 2019 मध्ये तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवली आणि तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसलात. यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेलं नव्हतं, असं देखील त्यांनी म्हटलंय.
आता जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी खेळ जिंकला, असं म्हणावं लागेल. पण हे आकडे सातत्यानं बदलत आहेत. त्यामुळे लगेच यावर भाष्य करता येणं कठीण असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक भारतकुमार राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमका किती आकडा आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. शिंदे यांनी यादी सादर केल्यानंतर नेमकं समीकरण स्पष्ट होईल. या यादीची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच पुढील समीकरणं कशी होतात, यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. आताच यावर भाष्य करणं घाईच होईल, असंही ते म्हणालेत.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलंय, की 37 आमदार जर एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, तर आता याची पुढील प्रक्रिया विधीमंडळात होईल. सरकारला मुख्यमंत्र्यांना विश्वासमत प्रक्रिया करावी लागेल. विश्वासमत दर्शक जर प्रस्ताव आणायचा असेल, तर अधिवेशन बोलवावं लागले. त्यानंतरच अविश्वास ठराव होऊ शकतं. तोपर्यंत आता असलेले आमदार एकनाथ शिंदेसोबत राहतील का, असाही प्रश्न उपस्थित होतो. सरकार तर अल्पमतात येईलच, पण शिवसेनेच्या अंतर्गत अडचणी आणखी वाढतील, असंही त्यांनी म्हटलंय.