मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलं आहे. आज एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री (Maharashtra new Cm) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीला फाटा देत एकनाथ शिंदे यांनी आज अखेर भाजपशी घरोबा (BJP) करत नवं सरकार स्थापन झालं आहे. राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा तितकाच रंजक आहे. एक रिक्षावाला ते राज्याचे 30 वे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री घोषणा ही बाबही अनेकांसाठी सरप्राईजिंग होती.
एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतानाही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या पायाशी बसलेला फोटो त्यांनी ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सर्वात मोठं सत्तांतर घडून आलं. महाविकास आघाडी सरकारला याचमुळे पाउतार व्हावं लागलंय. तर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आधी मी कॅबिनेटमध्ये नाही बोलणारे फडणवीसही आता पुन्हा कॅबिनेटमध्ये दिसणार आहेत. फडणवीसांचं उपमुख्यमंत्री होणं हेही तेवढेच सरप्राईज देणारं आहे.