मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 पेक्षा जास्त आमदारांनासोबत घेत बंड पुकारलाय. सुरतमध्ये असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार शिवसेनेमुळे नाराज असल्यानं ते सध्या सुरतमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीची (NCP) साथ नाही म्हणजे नाहीच, असा इशारा शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासह आणखी दोन प्रस्ताव शिंदे यांनी ठाकरे सरकारला दिले आहेत. भाजपसोबत सरकार स्थापन करा, मी उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असंही शिंदे यांनी म्हटलंय. यामुळे आता शिंदेंचा प्रस्ताव ठाकरे मान्य करणार का, हे पाहावं लागेल.
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. शिवाय राज्यात शिवसेनेची सत्ता असण्यापेक्षा राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचं चित्रं आहे. युतीच्या काळात मुख्यमंत्री भाजपचा असला तरी सत्तेचं केंद्र मातोश्री असायचं. आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सत्तेचं केंद्र सिल्व्हर ओक झालं आहे. दोन पवारांच्यापुढे आघाडी सरकार जात नसल्याने शिंदे नाराज होते. शिंदे यांच्या बंडामागचं हे सुद्धा एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना आणि भाजपची आघाडी व्हावी असं एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीपासूनचं मत होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि भाजपची युती ही स्वाभाविक युती आहे, असं त्यांचं मत होतं. मात्र, एका मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे शिंदे यांच्यासह अनेकजण नाराज होते. त्यामुळेच त्यांनी बंड पुकारल्याचं सांगितलं जातंय.
राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद आहे. तसेच अर्थ खातंही आहे. त्यामुळे आमदारांना किती निधी द्यायचा हे राष्ट्रवादीच्या हाती आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून सातत्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला. राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र भरघोस निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने गेल्या अडीच वर्षात निधी मिळण्यावरून कधीच तक्रार केली नाही. उलट काँग्रेसने निधी बाबत सर्वात आधी तक्रार केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनीही या तक्रारी केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. याबाबत आमदारांकडून सातत्याने शिंदे यांना विचारणाही केली जात होती.