औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांचा आज औरंगाबाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्या ईडी कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, इकडे विकास कामांची मोठी कारवाई करायची आहे, अशी मिष्किल प्रतिक्रिया देत त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे. एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांचा कालचा दिल्ली दौरा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे हे काल गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी थेट दिल्लीमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. यावरून आता विरोधक देखील प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. या चर्चेनंतर पुन्हा एकनाथ शिंदे हे औरंगाबादेत दाखल झाले. कालच्या बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याने लवकरच विस्तार होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे आज संजय राऊत यांच्या घरी अचानक इडीचं पथक दाखल झालं. संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याने राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून संजय राऊत यांच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडी सारख्या संस्थांना चौकशीचे अधिकार असतात, त्यांना उत्तरे द्यावी लागतात. जर कोणी खरच दोषी असेल तर त्यावर निश्चित कारवाई व्हावी, मात्र हे जर केवळ राजकीय सूडभावनेतून होत असेल तर ती आपली परंपरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.