औरंगाबाद : शिवसेनेचे मुख्यपत्र दैनिक सामनामधून( Daily Samana) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि शिंदे गटावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जाहीर सभेत शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. सामनाच्या रोखठोक मध्ये एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे अशी टीका करण्यात आली होती. पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरू नका असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.
सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका. म्हणजे टिकेच सकाळ दुपार रात्रीचे तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही.
मुंबई आपली आहे. मराठी माणसांची आहे मुंबई खेळायला शिंदे गट त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय जनता पक्ष काम करत असल्याचा बिन बुडाचा आरोप केला जात आहे. मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी हिंमत असेल तर पुढच्या रोखठोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरला आहे याची आकडेवारी जाहीर करावी असे आव्हान दिले.
अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मत मागितली. मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? मराठी माणूस विरार, बदलापूर, वांगणी कडे का गेला याचा विश्लेषण पण रोखठोक मधून केलं पाहिजे. असं धाडस ते करणार नाहीत.
फक्त निवडणुका आली की मराठीचा मुद्दा पुढे करायचा आणि निवडणूक संपली म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळीच करतात. मराठी माणूस देशोधडीला का लागलाय? तो मुंबई सोडून का चाललाय याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आज लालबाग, परळ, दादर, भांडुप, मुलुंड मधील घराघरात जात आहे. जर तुम्ही पूर्वी गेला असता मराठी माणसाचा दुःख समजून घेतली असती तर मुंबईतला मराठी टक्का कमी झाला नसता अशा शब्दात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांवर निशाणा साधला. मतांसाठी मराठी माणसांचा वापर करायचा मग दुसऱ्यांवर फोडायचं खापर ही त्यांचे पहिल्यापासून ची जुनी पद्धत आहे.
शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे असे म्हटले पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरू नका. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले मग हिंदुत्व बुडवले. मग, बाळासाहेबांच्या विरोधकांशी हात मिळवणी केली. फक्त सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसला जवळ केले. बाळासाहेबांना धोका कोणी दिला. त्यांचे विचार पायदळी कोणी तुडवले हे आधी तुम्ही महाराष्ट्राला सांगा असं खुलं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.
आम्ही मोदींचे हस्तक असल्याची टीका झाली. हस्तक होण्यापेक्षा ज्याने बाळासाहेबांच्या विचार पुढे नेले मोदी साहेबांनी आणि अमित शहांनी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय धाडसी घेतला त्यांचा हस्तक म्हणून केव्हाही चांगलं. ज्या गद्दार आणि देशद्रोही लोकांचा हस्तक होण्यापेक्षा हे बरं असं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.