पंढरपूर : आमदारानंतर आता नगरसेवक आणि पदाधिकारी देखील (Shivsena) शिवसेनेतून बंड करुन (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी होत आहेत. यापूर्वी नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात हे पाहवयास मिळाले आहे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली नव्हती. पण पंढरपूरातील मेळाव्यात (Shivsainik) शिवसैनिकही किती त्रस्त आहेत याचा पाढा वाचून दाखवला आहे. पक्ष नेतृत्वाकडून कसे दुर्लक्ष होत आहे हेच त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार का हे पाहणे महत्वााचे ठरणार आहे. शिवसैनिकांकडे दुर्लक्ष म्हणत त्यांनी पक्ष नेतृत्वाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसैनिकावर कसा अन्याय झाला हे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसैनिकांना मेळाव्याला बोलावले जायचे पण त्याची येण्याची तरी परिस्थिती आहे का याचे भान कधीच ठेवले गेले नाही. त्यामुळे अनेक वेळा जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख भेटून आपल्या वेदना सांगत होते. अनेकजण तर रडले असल्याचेही शिंदे म्हणाले . अशा परस्थितीमध्ये नगर विकास विभागातून सातत्याने निधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकटा माणूस कुठे-कुठे पुरवणी येणार अशी माझी आवस्था झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसैनिकांवरील वेळ बदलणार असल्याचे सांगत त्यांनी एकप्रकारे आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे.
पक्ष उभारणीमध्ये खरे योगदान हे शिवसैनिकांचेच राहिलेले आहे. मात्र, त्यांचे देखील खच्चीकरण करण्यात आले. अनेकांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. तर कुणाला तडीपार व्हावे लागले. असे असतानाही पक्षाकडून काहीच मिळाले नसल्याचे सांगत शिंदे यांनी आता शिवसेनेतील पदाधिकारी यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत काही जिल्हा प्रमुखांनी देखील शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले आहे. मात्र, यावेळी शिवसैनिक किती त्रस्त आहे हे शिंदे यांनीच सांगितल्याने यामध्ये अजून काही फरक पडणार का हे पहावे लागणार आहे. शिवाय शिवसैनिकावर आता अन्याय होणार नसल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहानच केले असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात मुख्यमंत्री आणि आम्ही मंत्री असताना देखील शिवसैनिकांना न्याय मिळाला नाही हे दुर्भाग्य आहे. सांगलीच्या सचिन कोळेकर यांना तर मोक्का लागला होता. अशा परस्थितीमध्येही काही केले गेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांनाच न्याय मिळत नसेल तर काय उपयोग अशी स्थिती झाली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पण आता अडीच वर्षच नाहीतर भविष्यात केव्हाच शिवसैनिकावर अन्याय होणार नसल्याचे आश्वासन देत आपणचे शिवसैनिकांचे नेतृत्व करणार असेच त्यांनी सांगितले आहे.