सिंदुधुर्ग : लोकसभेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंचा मुलागा निलेश राणेंचा पराभव झाला. मात्र या निकालानंतर नारायण राणे यांनी निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना आता स्वत: निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.
लोकसभेच्या निकालात ईव्हीएमपासून ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही लोकप्रतिनिधींसोबत करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली. हेराफेरीचा आरोप पूर्ण खोटा आहे, असं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे आणि शिवसेनेकडून विनायक राऊत अशी लढत झाली. यामध्ये विनायक राऊत यांनी बाजी मारली. मात्र नारायण राणे यांनी हा पराभव मान्य नसल्याचं म्हणत, निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला.
“हा जो निकाल आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही. आपण पराभूत झालो असलो तरी हा पराभव आपल्याला मान्य नाही. या निवडणुकीत आपला पक्ष कुठेच कमी पडला नाही. चांगल्या प्रकारचा प्रचार झाला. वातावरण आपल्या बाजूने होतं. या उलट शिवसेना कमकुवत होती. कुठेही शिवसेनेच्या बाजूने मतदारसंघात वातावरण नव्हतं. शिवसेनेचे मतदान केंद्राबाहेर बूथही दिसत नव्हते. असं असताना शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं हे संशयास्पद आहे”, असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
राणेंच्या आरोपांना निवडणूक आयोगानेच उत्तर देत, सर्व आरोप फेटाळले आहेत.
एनडीएचे दोन घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा लढत झाली. या लोकसभा निवडणुकीत बालेकिल्यात शिवसेनेची, तर नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत 1 लाख 78 हजारांपेक्षा जास्त मतांनी विद्यमान खासदार विनायक राऊत निवडून आले. माजी खासदार निलेश राणे यांचा पुन्हा एकदा पराभव करत विनायक राऊत यांनी बाजी मारली.
संबंधित बातमी
कुठेही शिवसेनेच्या बाजूने वातावरण नव्हतं, मुलाचा पराभव मान्य नाही : राणे