कोल्हापूर : ब्राम्हण समाजाविरोधात केलेलं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींना भोवलं आहे. राजू शेट्टी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील प्रचारसभेत ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा विरोध ब्राम्हण समाजाकडून करण्यात आला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर राजू शेट्टी यांनी नोटीस पाठवण्यात आली होती. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टींच्या विरोधात ब्राम्हण सभा आणि ब्राम्हण समाजाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. तसेच्या त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. अशा आशयाचे निवदेनही तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले होते.
राजू शेट्टींचं आक्षेपार्ह वक्तव्य
राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातकणंगले येथील सभेत भाषण करताना म्हणाले, सीमेवर आमची पोरं जातात, कुणा देशपांडे, कुलकर्णींची पोरं जात नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाजात संतापाची लाट उसळली होती.
सीमेवर सैनिक जातीसाठी नाही, तर देशासाठी लढतात याचा शेट्टींनी विसर पडला आहे. ते लोकप्रतिनिधी असताना जबाबदार व्यक्तीने सैनिकांची जात काढणे, जातीयवादी वक्तव्य करणे हे निंदनीय आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे, असं निवेदन ब्राम्हण समाजाकडून करण्यात आले होते.
राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. सध्या काँग्रेस- राष्ट्रावादीसोबत आघाडी करुन राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.