नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. या तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाने या तीन पक्षांना नोटीस पाठवली असून 20 दिवसात उत्तर मागितलं आहे.
2014 च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही या पक्षांना दिलासा मिळाला होता. कारण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी करणार असल्याचा नियम निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे हा दिलासा आता जास्त काळ टिकणार नाही असं दिसून येतंय. दुसरीकडे बसपाला दिलासा मिळालाय. कारण, या पक्षाने उत्तर प्रदेशात 10 जागा जिंकल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये आमदारही निवडून आले आहेत.
सीपीआय नेत्याने लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. आमचं अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल. आम्हाला अपेक्षा आहे, की आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा दर्जा काढल्यानंतरही पक्षाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही या नेत्याने सांगितलं होतं.
काय आहे नियम?
या निवडणुकीत टीएमसीला 22, सीपीआयला 3 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक चिन्ह अधिनियम 1968 नुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज असते. याशिवाय त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणंही अनिवार्य आहे. सध्या टीएमसी, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस आणि मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.