नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत इव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येईल असे जाहीर केले. पण त्यानंतर येत्या निवडणुकीत ईव्हीएमशी जोडलेल्या 50 टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी केली होती. याबाबत या पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्व लोकसभा मतदारसंघातील 50 टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करायला जवळपास पाच ते सहा दिवस लागतील. यामुळे मतमोजणीस वेळ लागेल, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
दरवेळी निवडणूक झाल्यावर पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले जाते. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे, असा दावा विरोधीपक्ष करत असतात. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून निवडणुकांमध्ये ईव्हीएममशीन सोबत व्हीव्हीपॅट बसवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
परंतु त्यानंतर काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅटबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मोजणीची पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जर विरोधीपक्षांची मागणी मान्य केली तर सर्व मतदारसंघातील 50 टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करायला जवळपास पाच ते सहा दिवस लागतील. यामुळे निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी 28 मे रोजी म्हणजे पाच ते सहा दिवस उशिरा जाहीर होईल, असे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सांगितलं.
व्हीव्हीपॅट सिस्टम काय आहे?
वोटर वॅरिफिबल पेपर ऑडिट ट्रेल ‘Voter Verifiable Paper Audit Trail’ म्हणजेच व्हीव्हीपॅट. मतदाराने ईव्हीएम मशीनवर मत नोंदणी केल्यानंतर त्याने ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याचे नाव, क्रमांक, निवडणूक चिन्ह याची एक पावती व्हीव्हीपॅटद्वारे तयार होते. मत दिल्यानंतर अवघ्या सात सेकंदात ही पावती तयार होते. त्यानंतर आपोआप ही पावती कट होऊन त्या मशीनचा बीप वाजतो. आणि ती पावती एका काचेच्या पेटीत जमा होते. याद्वारे मतदाराने त्याला हव्या त्या मतदाराला मत दिले आहे का हे पाहू शकतो. कधी कधी ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडते किंवा तांत्रिक बिघाड होतो. त्यावेळी व्हीव्हीपॅटद्वारे आयोग मतमोजणी करु शकते.