मुंबई: निवडणुका या एखाद्या खेळासारख्या असतात. त्या तशाच खिलाडूवृत्तीने लढवायच्या असतात. यामध्ये दडपशाही आणि यंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रसेच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला लगावला. निवडणूकीच्या तोंडावर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा डाव असून हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. केवळ एखादी निवडणूक जिंकण्यासाठी देशाच्या लोकशाहीला आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेलाच गुंडाळून ठेवणं कितपत योग्य आहे, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. (NCP MLA Rohit Pawar slams BJP over raids on leaders during election period)
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपकडून निवडणुकांच्या काळात करण्यात येणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर भाष्य केले. सध्या आसामबरोबर तमिळनाडूही निवडणुकांना सामोरं जात आहे. तमिळनाडूमध्ये जरी ईव्हीएम सापडले नसले तरी डी.एम.के पक्ष प्रमुख एम. के स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर ऐन निवडणुकीत छापे मारण्याची घटना ही अनेक शंका उपस्थित करणारी आहे. इन्कम टॅक्स विभाग, ई.डी यासारख्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी लोकांची मने दूषित करण्यासाठी व निवडणुकांनंतर दबाव टाकून सत्ता स्थापन करण्यासाठी या संस्थांचा उपयोग केला जातो का? अशी सार्वत्रिक चर्चा आता ऐकायला मिळते, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली. हे अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने जरी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होते.
2014 पासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, याकडे डोळेझाक करता येणार नाही. एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून हेतुपरस्सर केवळ एखादी निवडणूक जिंकण्यासाठी जर असे प्रकार केले जात असतील तर देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
‘कोरोना संपलाय, मास्क लावण्याची गरज नाही; मास्क लावले तर ब्युटीपार्लर्स कशी चालणार?’
West Bengal Election 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘या’ एका फोटोची देशात चर्चा का?
Assam Election 2021 : खासगी गाडीत EVM मशीन! 4 अधिकारी निलंबित, पुन्हा मतदान होणार
(NCP MLA Rohit Pawar slams BJP over raids on leaders during election period)