मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शर्मा हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप युतीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या शर्मा यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपत चांगलीच चुरस रंगली आहे.
प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येत्या काही महिन्यात ते निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच 4 जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज केला. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिले आहे. नियमाप्रमाणे त्यांनी हा राजीनामा दिला असून अद्याप पोलिस महासंचालकांना त्यांच्या या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सध्या शर्मा हे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शर्मा यांना अंधेरी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदिवली आणि नालासोपारा या दोन मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शर्मा यांच्या युतीतील प्रवेशाचा निर्णय ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा करुन घेतला जाण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून ‘जन आशीर्वाद दौरा’ केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महाराष्ट्रात ‘विकास यात्रा’ करणार आहेत. नुकंतच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला जळगावातून सुरुवात झाली आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेत. गेल्या अनेक ते वर्षापासून मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. सध्या ते ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर काम करतात. पोलीस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल ११३ गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नावावर नोंद त्यांच्या नावे आहे.