बिहार : बिहारच्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात एका हॉटेलमध्ये तब्बल 6 EVM (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात काल पाचव्या टप्प्यात मतदान झालं. त्यावेळी लोकांना एका स्थानिक हॉटेलमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी नागरिकांनी तातडीने हॉटेलबाहेर गर्दी करुन गोंधळाला सुरुवात केली.
या EVM दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर स्वत: अधिकाऱ्यानेच (सेक्टर मजिस्ट्रेट) ठेवले होते. हे ईव्हीएम उपविभागीय अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. तसंच याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी रंजन घोष यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी मुजफ्फरपूरच्या स्थानिक हॉटेलमध्ये EVM आणि VVPAT मशिन मिळाले होते. सेक्टर मॅजिस्ट्रेटला काही राखीव मशीन देण्यात आले होते. मशीन खराब झाल्यानंतर ती मशीन वापरली जाणार होती. बिघडलेली EVM बदलल्यानंतर अधिकाऱ्याच्या कारमध्ये 2 बॅलिटिंग युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि एक VVPAT आढळले”
या अधिकाऱ्याने मशीन्स हॉटेलमध्ये घेऊन जाणं चुकीचं होतं. ते नियमाविरुद्ध आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.