मतदान एकाला, चिट्ठीवर नाव दुसऱ्याचेच; माजी पोलीस महासंचालकांची तक्रार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली : मतदानादरम्यान अनेक ठिकाणी EVM बिघाडीच्या तक्रारी आल्या आहेत. आता एका माजी पोलीस महासंचालकांनी देखील आपण मतदान एकाला केले आणि VVPAT च्या चिट्ठीवर दुसऱ्याचेच नाव आल्याची तक्रार सार्वजनिकरित्या सांगितली आहे. हा प्रकार मंगळवारी झालेल्या लोकसभा मतदानादरम्यान घडला. आसामचे माजी पोलीस महासंचालक हरेकृष्ण डेका यांनी हा VVPAT मशीन खराब असल्याचा मुद्दा उपस्थित केला. डेका म्हणाले, […]

मतदान एकाला, चिट्ठीवर नाव दुसऱ्याचेच; माजी पोलीस महासंचालकांची तक्रार
Follow us on

नवी दिल्ली : मतदानादरम्यान अनेक ठिकाणी EVM बिघाडीच्या तक्रारी आल्या आहेत. आता एका माजी पोलीस महासंचालकांनी देखील आपण मतदान एकाला केले आणि VVPAT च्या चिट्ठीवर दुसऱ्याचेच नाव आल्याची तक्रार सार्वजनिकरित्या सांगितली आहे. हा प्रकार मंगळवारी झालेल्या लोकसभा मतदानादरम्यान घडला.

आसामचे माजी पोलीस महासंचालक हरेकृष्ण डेका यांनी हा VVPAT मशीन खराब असल्याचा मुद्दा उपस्थित केला. डेका म्हणाले, ‘गुवागाटीमध्ये लचित नगरच्या एल. पी. स्कूलमध्ये माझे मतदान केंद्र होते. तेथे मतदान करणारा मी पहिला व्यक्ती होतो. माहिती नाही पण मतदान सुरु व्हायला काही कारणाने उशीर झाला. जेव्हा मी तेथे मतदान केले, तेव्हा VVPAT मधून येणाऱ्या चिट्ठीवर ज्याला मतदान केले त्याचे नाव न येता दुसऱ्याचेच नाव आले. यावर मी तेथे उपस्थित असलेल्या मतदान अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी मला तक्रार दाखल करु शकतो असे सांगितले. तसेच तक्रारीची पावती दिली जाईल, त्यासाठी 2 रुपये खर्च येईल. त्यानंतर याची चौकशी होईल.’

‘शिक्षेच्या भीतीने तक्रारच केली नाही’

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या या माजी पोलीस अधिकाऱ्याने असे झालेले लक्षात येऊनही याची तक्रार केली नाही. यामागे कारण होते तक्रार चुकीची ठरली तर त्यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते या भीतीचे. डेका यांनी सांगितले, जर तक्रार चुकीची निघाली तर मला 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती मला मतदान अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. कारण याचा तपास कसा होईल, हे मला माहिती नाही.

दरम्यान, मंगळवारी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आसाममध्ये तिसऱ्या आणि तेथील अंतिम टप्प्यात 4 जागांवर मतदान झाले. आसाममध्ये एकूण 14 जागा आहेत. त्यामुळे आसाममध्ये या 14 जागांवर कोण जिंकणार हे आता पाहावे लागणार आहे.