मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपसोबत (BJP) असलेली 40 वर्षांची साथ सोडून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. खडसेंच्या पक्षप्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं, मात्र राष्ट्रवादीकडून तितक्याच उत्साहाने आणखी चार माजी आमदारांचेही पक्षात स्वागत झाले. गेल्या दोन महिन्यात राष्ट्रवादीने पक्षप्रवेशाचा अक्षरशः धडाका लावला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण एकनाथ खडसे, सीताराम घनदाट, उदेसिंग पाडवी अशा तब्बल पाच माजी आमदारांनी नजीकच्या काळात ‘घड्याळ’ हाती बांधले. (Ex MLAs who join NCP)
उदेसिंग पाडवी – भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी (शहादा, नंदुरबार)
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी 9 सप्टेंबरला राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे.
उदयसिंग पाडवी हे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहाद्यातून उदयसिंग यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिलं.
उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उदयसिंग पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. त्यानंतर पाडवींना मतदारसंघही बदलून मिळाला. त्यामुळे शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी कौल दिला नाही.
सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी)
परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी 16 सप्टेंबरला राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. सीताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते. यंदाच्या निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. गंगाखेड विधानसभेचे तिकीट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या जागी घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे घनदाट यांचा राष्ट्रवादीप्रवेश तेव्हा स्थगित झाला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातून बाजी मारली.
रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस – (चिपळूण, रत्नागिरी)
रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची 30 सप्टेंबरला पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कदम यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये ते चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले होते.
रमेश कदमांनी 2009 मध्ये शेकापच्या तिकिटावर रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. कदम यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. काही काळातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र अवघ्या आठच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. मात्र जिल्हाध्यक्ष पदावरुन बाजूला केल्याने ते काहीसे नाराज होते.
एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव)
गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.
1995 ते 1999 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे.
2014 मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून 3 जून 2016 रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी 1987 मतांनी त्यांचा पराभव केला. (Ex MLAs who join NCP)
राजीव आवळे – जनसुराज्य – (हातकणंगले, कोल्हापूर)
कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला राजीव आवळेंनी सुरुंग लावला होता.
राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. हातकणंगले मतदारसंघावर आवळेंचं वर्चस्व होतं. मात्र काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा गड खालसा केला होता.
सदाशिव पाटील – काँग्रेस – (खानापूर आटपाडी, सांगली)
सांगलीतील खानापूर-आटपाडीचे माजी आमदार आणि काँग्रेसला रामराम ठोकलेले ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील यांनी फेब्रुवारीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी विटा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
सदाशिव पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते, मात्र गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसशी फारकत घेतली होती. विधानसभा निवडणुकीत सदाशिव पाटील यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार
सदाशिव पाटील – काँग्रेस – (खानापूर आटपाडी, सांगली)
उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार)
सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी)
रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस – (चिपळूण, रत्नागिरी)
एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव)
राजीव आवळे – जनसुराज्य – (हातकणंगले, कोल्हापूर)
संबंधित बातम्या :
माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी
अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत
आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
(Ex MLAs who join NCP)