सोलापूर : मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सावंतांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट (Tanaji Patil meets Uddhav Thackeray) घेतली.
सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यात जयवंतराव प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी सावंत यांनी ‘मातोश्री’ गाठलं. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. जलसंधारण मंत्रिपदी असताना, तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटलं, या दाव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत खट्टू झाले होते. मंत्रिपद नाकारल्यापासून तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली नव्हती. त्यांनी शिवसेनेच्या अनेक बैठकांना दांडी तर मारलीच, शिवाय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीलाही गैरहजेरी लावली होती. त्यामुळे नाराजीनाट्यानंतरच्या पहिल्याच भेटीत उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी काय चर्चा केली, याची उत्सुकता लागली आहे.
‘तीर’ ऐसा लगा… शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची भाजपशी युती
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंतांनी शिवसेनेला धक्का दिला होता. सावंतांनी बंडखोरी करत भाजपला साथ दिली होती. तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली होती.
‘तानाजी सावंत हटाव’ अशी मागणी करत सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी मुंबईत आले होते. सोलापुरात “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा” अशी मागणी करणारे पोस्टरही लावण्यात आले होते. त्यामुळे तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु कारवाई टाळण्यासाठीच तानाजी सावंत यांनी दिलजमाई केल्याचं दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर (Tanaji Patil meets Uddhav Thackeray) त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.