सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज (29 जून) पार पडली. या निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडले. एकूण 73.25 टक्के मतदारांनी मतदान केलं. मात्र, यादीतील एकूण 47 हजार 145 मतदारापैकी जवळपास 9 हजार हयात नाहीत. त्यामुळे हयात मतदारांपैकी तब्बल 91 टक्के मतदारांनी मतदान केलंय (Exit Poll of Krishna Sugar Mill Election Karad 2021 by the strelema Know who will win).
या निवडणुकीत एकूण 47145 मतदारांपैकी सुमारे 34532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी (1 जुलै) मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. मात्र, त्याआधी ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता सहकार पॅनल राखणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
कृष्णा कारखान्याच्या भागावर विद्यमान मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम यांचा प्रभाव असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरली. माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांच्यात मनोमिलन न झाल्यानं या दोघांची थेट लढत विद्यमान चेअरमन सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलशी झाली. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रयत पॅनलसाठी मागील आठवडाभर आक्रमक प्रचार केला.
द स्ट्रेलेमा या संस्थेने मतदानानंतर सभासदांशी संवाद साधून निवडणुकीचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या एक्झिटपोलनुसार, या निवडणुकीत सहकार पॅनलला 47-50 टक्के मतं मिळत आहेत. संस्थापक पॅनलला 35-38 टक्के मतं आणि रयत पॅनलला 15-18 टक्के मतं मिळताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार सहकार पॅनलला 10-12 टक्क्यांची आघाडी मिळताना दिसत आहे.
द स्ट्रेलेमा एक्झिट पोलनुसार कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 जागा सहकार पॅनलकडे जाताना दिसत आहे. संस्थापक पॅनल आणि रयत पॅनलला खातंही खोलता येणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
सहकार पॅनल हे जयवंतराव भोसले यांनी १९८९ साली झालेल्या कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीत स्थापन केले होते. पॅनलने आजपर्यंत १९९९ आणि २०१५ साली विजय मिळवलेला आहे. सत्तेत असताना दोन्ही वेळेस जयवंतराव भोसले यांचे पुत्र डॉ. सुरेश भोसले हे चेअरमन राहिलेले आहेत.
सहकार पॅनलचे सुरेश भोसले यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचा १२ वर्ष कारखाना चालविण्याचा अनुभव, सहकारी संस्था व्यावसायिक रित्या चालवून फायद्यात ठेवण्याचा इतिहास, सोबतच त्यांचे पुत्र अतुल भोसले यांचा कराड तालुक्यातील वाढता राजकीय प्रभाव, सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार सोबत टिकवून ठेवण्यात आलेल यश ह्या सहकार पॅनलच्या जमेच्या बाजू आहेत.
रयत पॅनल १९८९ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केले होते. १९८९-९९ आणि २००५-१० ह्या १५ वर्षाच्या कालावधीत रयत पॅनल हे सत्तेत राहिलेले आहे. ८९ ते ९९ साली यशवंतराव मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते हे तर २००५ ते १० मध्ये डॉ. इंद्रजित मोहिते हे चेअरमन राहिले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत मात्र मदनराव मोहिते हे सहकार पॅनल सोबत असल्याने रयत पॅनलचे नेतृत्व डॉ. इंद्रजीत मोहिते हे करत आहेत.
डॉ. इंद्रजीत मोहिते यांची जनमानसातील प्रतिमा अभ्यासू असून त्यांनी कारखान्यात नव-नवीन प्रयोग केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोंजनरेशन प्रकल्पाचा समावेश होतो. त्यांची सभासदांचे अभ्यास करून मुद्दे मांडण्याची शैली आणि निवडणुकीच्या दरम्यानच्या त्यांचा व्हिडीओ च्या माध्यमातून त्यांनी सभासदांशी साधलेला संवाद कृष्णाच्या सभासदांमध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे.
संस्थापक पॅनल (Sansthapak Panel):
संस्थापक पॅनलची स्थापना अविनाश मोहिते यांनी २०१० साली केली. दोन्ही पारंपरिक विरोधी पॅनलच्या मनोमिलनानंतर तयार झालेली जागा त्यांनी योग्य रित्या घेतली. त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी घवघवीत यश प्राप्त करत २०१० ते २०१५ दरम्यान चेअरमन पद भूषवले.
या कालावधीत त्यांचा सभासदांशी असलेला थेट संपर्क यामुळे कारखान्याचा २४*७ चेअरमन म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा २ रुपये/किलो प्रमाणे साखर देण्याचा निर्णय त्यावेळी ऐतिहासिक ठरला होता. कुठलही राजकीय पाठबळ नसताना प्रस्थापित पॅनलच्या विरोधात उभा राहिल्याने अविनाश मोहिते यांच्या बद्दल मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येते. अविनाश मोहिते राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असून या निवडणुकीत त्यांच्या मागे राष्ट्रवादी पक्ष कशा पद्धतीने उभा राहतो यावर या निवडणुकीचे बरेचशे समीकरणे अवलंबून असणार आहेत. मागील निवडणुकीत सहकार पॅनलला मदत करणाऱ्या ‘उंडाळकर गटाने’ अविनाश मोहिते यांच्या पॅनल ला मदत करण्याची भूमिका जाहीर केली, याचा निश्चितच फायदा संस्थापक पॅनल ला होताना दिसेल.
जयंत पाटील (Jayant Patil):
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे इस्लामपूरचे आमदार आहेत. कृष्णेचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सर्वच सभासद मतदार हे इस्लामपूर मतदारसंघात येतात. तसेच रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि नेर्ले-तांबवे या गटातून बहुतांश संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते निवडून येत आलेले आहेत. यासोबतच शिराळा मतदारसंघातील काही गावांत कृष्णेचे सभासद आहेत आणि तिथे देखील मानसिंग नाईक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील 39 गावात कृष्णेचे जवळपास 14000 सभासद आहेत. यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेला कृष्णेच्या निवडणुकीत अनन्य साधारण महत्व होतं.
जयंत पाटील यांचे कार्यकर्ते तिन्ही पॅनलमध्ये विखुरलेले असल्याने त्यांची कृष्णेच्या निवडणुकीत भूमिका नेहमीच तटस्थ राहिलेली आहे.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) :
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कृष्णेच्या निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील ५६ गावे व जवळपास २८५०० सभासद आहेत. कराड कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे पुत्र अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत कडवे आव्हान दिले होते. यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर प्रभाव टाकणारे प्रमुख नेते असल्याने कृष्णेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका अधिक महत्वपूर्ण होती.
बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil):
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरचे आमदार असून कराड उत्तर मतदारसंघातील 10 गावांमध्ये कृष्णेचे जवळपास 1500 सभासद आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सहकार मंत्री असल्याने आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असल्याने बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते.
विश्वजित कदम (Vishwajeet Kadam):
विश्वजित कदम हे यशवंतराव मोहिते यांचे नातेवाईक असल्याने आणि कदम-मोहिते घराण्याचे आधीपासूनच एकमेकांना मदत होत असल्याने राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम यांची मदत डॉ. इंद्रजित मोहिते यांना होताना दिसते. विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील 21 गावांमध्ये कृष्णेचे जवळपास 3000 सभासद आहेत. तसेच त्यांच्या भारती विद्यापीठ व इतर संस्थांचे जाळे कृष्णेच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांचीही भूमिका कृष्णेच्या राजकारणात महत्वाची ठरते. विश्वजित कदम कृष्णेच्या निवडणुकीत सर्वाधिक सक्रिय असून, त्यांचे कार्यकर्ते डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या ‘रयत पॅनल’चा प्रचार करताना दिसून आले.
एकूण जागा: 21, सहकार पॅनल: 15, संस्थापक पॅनल: 06, रयत पॅनल: 00
Exit Poll of Krishna Sugar Mill Election Karad 2021 by the strelema Know who will win