मुंबई : आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांची शिवसेनेच्या (shivsena) कल्याण शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कल्याण शहर प्रमुखपदी आता सचिन बासरे (Sachin Bassare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून माहिती देण्यात आली आहे. सचिन बासरे हे शिवसेनेकडून तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जे आमदार शिवसेनेविरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर आता पक्षाकडून कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता आमदार विश्वनाथ भोईर यांची देखील कल्याण शहर प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विश्वानाथ भोईर हे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत. ते सुरुवातीपासूनच शिंदे गटासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. दरम्यान ज्या आमदारांनी तेव्हा बंडखोरी केली त्यांच्यावर आता शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करावाई करण्यात येत आहे. आज कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांया शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याजागी सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बासरे यांचा देखील कल्याणमध्ये चांगला जनसंपर्क आहे. ते शिवसेनेकडून सलग तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. तसेच त्यांनी शिवसेनेत अनेक संघटनात्मक पातळ्यांवर काम केले आहे. आज शिवसेनेचे आणखी एक माजी आमदार विजय शिवतारे यांना देखील शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आज माजी मंत्री विजय शिवतारे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवण्यात आला होता. विजय शिवतारे यांचे पक्षाचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर विजय शिवतारे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाला संजय राऊत हेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राऊतांची निष्ठा शरद पवार यांच्याशी किती आणि उद्धव ठाकरे यांच्याशी किती हे सर्व महाराष्ट्राला कळते मग उद्धव ठाकरे यांना कळत नाही का असा सवालही यावेळी शिवतारे यांनी उपस्थित केलाय.