चंद्रपूर : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी दिली. मुख्यमंत्री आणि मविआ वेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन अपेक्षित असल्याची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे प्रयत्न होत आहेत. शिंदे गटाच्या प्रस्तावावर आ. किशोर जोरगेवार निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील अन्य अपक्ष आमदारांशी बोलणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील घडामोडींकडं आमदारांचं लक्ष आहे. किशोर जोरगेवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात वेगळी घटना घडत आहे. चंद्रपूर सर्व अपक्ष आमदार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. काय काय घडत आहे, काय काय होऊ शकते. याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्याकडून काहीही संपर्क झालेला नाही. ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. दुसऱ्या गटाकडून म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून संपर्क झाला आहे. कारण नेहमी अपक्षांची भूमिका महत्त्वाची असते, असं किशोर जोरगेवार म्हणाले.
माझी भूमिका ही जनतेची भूमिका राहणार आहे. कालपासून मतदारसंघातील जनतेचा विचार घेत आहे. त्यांच्याकडून जो कल येईल. त्यानुसार मला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळं मी विचार करून निर्णय घेईल. सर्व लोकांनी मतदान करून निवडून दिलं. त्यामुळं त्यांच्या मतांचा विचार करेन, असं किशोर जोरगेवार म्हणाले. मतदारांशी भेटून त्यांची मतं घेऊन रणनीती ठरविणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीची सत्ता उलथवून पाडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केला. या गटात दोन-तृतियांश पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय अपक्षांचा पाठिंबा घेऊन ते भाजपला भेटल्यास नवं सरकार स्थापन करू शकतात. यासाठी अपक्षांशी संपर्क सुरू आहे.