जयपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारनेही शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. राजस्थान सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली. ‘काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या सरकारने शेतकरी कर्ज माफी करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस जे बोलते ते करुन दाखवते’, असे सचिन पायलट यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी द्वारा किए गए वादे के अनुसार हमारी सरकार ने किसानों के कर्ज माफ करने की घोषणा कर दी है – कांग्रेस जो कहती है वह करती है!
— Sachin Pilot (@SachinPilot) December 19, 2018
राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत घेतलेल्या दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला मागे सारत 199 पैकी 99 जागांवर विजयी ठरली. त्यानंतर राहुल गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची धुरा अशोक गहलोत यांच्याकडे सोपवली, तर सचिन पायलट यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.
काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणूक ही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लढवली. यामध्ये जर आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ, असे राहुल गांधींनी आपल्या प्रत्येक प्रचार सभे दरम्यान सांगितले. त्यांच्या या आश्वासनाला काँग्रेसने प्रत्यक्षात उतरवले आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता राजस्थानमध्येही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं.
याआधी मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकार आणि छत्तीसगडच्या बघेल सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती.