सातारा : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कराड दक्षिणचे भाजप उमेदवार अतुल भोसले (Fight between Atul Bhosale and Prithviraj Chavan) यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याद्वारे भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विलास उंडाळकर गटाला तिसरा जोरदार धक्का दिला आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव पाटील यांनी देखील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. तसेच भोसलेंच्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड तालुक्यातील विंग येथे झाला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी अतुल भोसलेंना पाठिंबा दिल्याने भोसलेंची ताकद वाढली आहे.
कराड दक्षिणमधील 100 हून अधिक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, सभापती, जिल्हापरिषद सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील यांनी कराडच्या 14 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे चव्हाण यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
अतुल भोसले यांनी आपल्या प्रचाराच्या सुरुवातीलाच जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. त्यांनी विरोधी उमेदवार श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीनिवास पाटील यांनी फक्त पदं भुषवल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. फक्त पद भुषवणं हा विकास नसतो, असाही चिमटा त्यांनी यावेळी काढला. आघाडी सरकारच्या काळात पैसा खर्च झाला, पण विकास झाला नसल्याची टीकाही उदयनराजेंनी केली.