मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही वापरण्यास सुरुवात झाली आहे (Political Fighting Photo of Balasaheb Thackeray). मात्र, याला शिवसेनेकडून आक्षेप घेतला गेल्याने या प्रकरणावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने हे प्रकरण गांभीर्याने घेत पावले उचलली आहेत. शिवसेना याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे (Political Fighting Photo of Balasaheb Thackeray).
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भगवा झेंडा आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यानंतर मनसैनिकांकडून राज ठाकरेंना हिंदुह्रदयसम्राटाची उपाधी देण्यात येत आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो वापरुन एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेला त्यांचा फोटो वापरण्यास सक्त मनाई केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मनसेच्या मंचावर आणि कार्यक्रमात वापरला नाही.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यानंतर आता मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाणीवपूर्वक वापरला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे आता मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. मनसेने बाळासाहेब ठाकरेंच्या सोशल मीडियावरील कॅम्पेनला विरोध केला आहे.
आम्ही केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हिंदुह्रदयसम्राट म्हणून उल्लेख करत आहोत. यात ना कुठलाही राजकीय प्रचार नसल्याचं स्पष्टीकरण मनसेनं यावर दिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरुन मनसे आपला जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरुन मनसे आणि शिवसेनेत राजकीय कलगीतुरा रंगलाय.