बारामतीतून अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने केली आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपाने खूप आधीपासून तयारी चालविली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत बारामती लोकसभा चर्चेची ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा जिंकण्याचा चंग भाजपाने मांडला आहे. आता बारामती येथून काही वेळा पूर्वी शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांच्या नाव जाहीर केल्याच्या काही वेळातच अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
शरद पवार गटाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहीली यादी आज जाहीर केली होती. या यादीत पाच जागांवरील आपल्या उमेदवारांची नावे शरद पवार जाहीर केली आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे तसेच शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वर्ध्या येथून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्कर भगरे तसेच नगरमधून निलेश लंके यांना लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातून नितेश कराळे गुरुजींना तिकीट मिळेल असे म्हटले जात होते. परंतू त्यांना तिकीट नाकारले आहे.
काँग्रेसचा परंपरागत अमेठी मतदारसंघ राहुल गांधी यांच्या पराभवाने निसटला होता. तेथे 2019 च्या निवडणूकीत भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्यामुळे जर अमेठी मतदार संघ कॉंग्रेसकडून निसटू शकतो. तर राष्ट्रवादीच्या हातातून बारामती मतदारसंघ का जाऊ शकत नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यामुळे बारामती मतदार संघ भाजपासाठी महत्वाचा बनलेला आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांना हा मतदार संघ राखणे शक्य होणार का ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.