नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नगरसेवक मुनावर पटेल यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. खैरणे येथे राहणाऱ्या रिक्षाचालक सुफियाना शेखचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी खैरणे येथील रिक्षा स्टँडवर घडली होती.
रिक्षाचालक सुफियाना खैरणे रिक्षा स्टँडवर गेला असता त्याला तिथे काही लोकांनी रिक्षा उभी करण्यास विरोध केला. यावर सुफियानाने का म्हणून विचारले असता, त्याला नगरसेवक मुनावर पटेल यांच्या कार्यलयावर नेले आणि मुनावर पटेल तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळे सुफियानाच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी तात्काळ आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मुनावर पटेल आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुनावर पटेल हे प्रभाग 55 चे नगरसेवक आहेत.
या झालेल्या घटनेबाबत मुनावर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला गुंतवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. यामुळे खैरणे परिसरात सोमवारपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुनावर यांच्या विरोधकांनी सुफियाना शेखच्या कुटुंबाला मदत केल्याची चर्चा विभागात सुरु होती. यामुळे पुन्हा दोन गटात दंगा होण्याची शक्यता असल्याने खैरणे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.